वृत्ती चा हा खेळ सारा
पैसा आणि आनंद लपवून लपत नाही असे म्हणतात. पण तरीदेखील लोक पैसे आणि आनंद का लपवू बघतात? काय कारण असावं पैसे आणि आनंद लपवण्या मागे? काही सुख मिळत असेल का हे लपवून?
हिंदीत 'खुशी बाटने से बढती है।',अशी म्हणे आहे आणि इंग्रजीत, 'Travel and tell no one, live a love story and tell no one, live happily and tell no one. People ruin beautiful things', अशी म्हण आहे. आता या संस्कारांमध्ये, या वागणुकी मध्ये, फक्त भाषेचं आंतर आहे का? की संस्कृतींचं आहे? की समाजाचा आहे? वृत्ती चे खेळ इथूनच सुरु होतात.
मला तर वाटतं यात फक्त विश्वासाचं अंतर आहे. जर आपल्याला आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या व्यक्तींवर विश्वास असेल तर आपण त्यांच्यासमोर आपला आनंद व्यक्त करताना आणि आपले पैसे किंवा मालमत्ता खर्च करताना कधीही मागेपुढे पाहणार नाही. आता माझ्या अवतीभवती असणारे माणसं माझे विश्वासू आहे म्हणून पैशाची उधळपट्टी करणं हे तर कुठल्याच सभ्यतेत योग्य होणार नाही, त्यामुळे या वागण्याला अपवाद म्हणून वगळता येणार नाही. आणि म्हणून प्रसंगाचा आढावा न घेताच आपल्या सुखाचे कथन करणे हे सुद्धा त्याचप्रकारे अयोग्य ठरते. म्हणजे काय, वेळ प्रसंग पाहून आपल्या आनंदाचा आणि योग्यरीत्या कमावलेल्या संपत्तीचा कथन किंवा वापर करणे हेच समजुद्दार व्यक्तीचे लक्षण आहे.
आता उरतो प्रश्न - लोक पैसे आणि आनंद लपवण्याचा प्रयत्न करतात तरी का? - याचा. 'गप जरा गप! नजरच लागायची नाही तर कोणाची!' / 'काही नाही ग . दिखावा आहे नुसता. पैसे आहेत पैसे आहेत, म्हणून इतका दिखावा करतं का कोणी!', असे विचार किंवा अशा विचारांची भीती आपल्या मनात कोणी ना कोणी टाकतच असतं. आता असा विचार करणाऱ्यांची चूक म्हणावी की जे या विचारांना घाबरतात त्यांची. मला वाटतं बरोबर की चूक हे जो-तो ज्याच्या-त्याच्या वृत्तीने ठरवू शकतो. इतरांबद्दल वाईट विचार केल्याने स्वतःचं चांगलं होतं ही वृत्तीच मुळात काल्पनिक आहे. आणि इतरांच्या संपत्तीचे मोजमाप ठेवून स्वतःच्या घरची संपत्ती वाढणे हे सुद्धा चमत्कारिकच म्हटले पाहिजे. पण असं असून सुद्धा, ही नजर येते कुठून? वाईट वृत्तीतून. इतरांचं यश पाहून ज्याला स्वतःच्या भविष्याची भीती लागते त्या न्यूनगंडातून. यावर उपाय एकच, सकारात्मक होणे. स्वतःच्या लेखी स्वतःची किंमत वाढवणे. इतरांना पाण्यात न बघणे. इतरांच्या यशात भाग घेणे. इतरांच्या आनंदात आनंदित होणे.
हे झालं नकारात्मक वृत्ती असणाऱ्यांच. पण आता ज्यांना यांची भीती वाटते त्यांनी काय बरं करावं? 'मी अमुक अमुक व्यक्ती समोर आनंदी चेहरा घेऊन जात नाही कारण मला माहितीये ती सदैव तोंड पाडून असते' असे म्हणणारे लोक निदान एकदा आपल्यासमोर येतात. 'मी अमुक अमुक व्यक्ती समोर पैसे खर्च करत नाही कारण तिचा डोळा नेहमी माझ्या पैशांवर असतो' असेही वक्तव्य करणारे लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला सहजरीत्या दिसू शकतात. माझ्या मते त्या अमुक अमुक व्यक्तीचा विचार न करता कधी कधी आपण स्वतःच्याच मनाप्रमाणे वागायला हवं. या वागण्यात काहीतरी नियंत्रण नक्कीच असावं पण इतरांच्या कटू वृत्तीची भीती नसावी. त्याची नजर किंवा त्याची वृत्ती वाईट आहे म्हणून मी स्वतःला रोखून ठेवणार, हे एक सक्तीचं न आवडणारं बंधन आहे. चोर त्याच्याच मनात असावा ज्याने काही चुकीचे कृत्य केलं आहे. उगाच आपला आनंद आणि आपली प्रतिष्ठा वाढवणारी संपत्ती लपवून जगणं हे काही सुखी जीवनाचं लक्षण नाही.
अतिशयोक्ती म्हणून, इतरांची अजिबातच परवा न करणं, हे एकाकी जीवनाकडे नेणारं पाऊल ठरेल. इतरांची परवा करत, वाईट वृत्तीला न घाबरत, आणि सुखाच्या क्षणी चार जवळच्या व्यक्तींना आनंदात सहभागी करूनच, खरं समाधान लाभेल.
अखेर,'लपवून ठेवलेला आनंद आनंदच नाही, आणि लपवून खर्च केलेला पैसा हा अभिमानास्पद नाही ', हेच खरे.


छान लिहिलंस...👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद!
DeleteIts all about by nature n by choice
ReplyDeleteIndeed. One's life is based on one's choices and the way of life is defined by his/her nature.
Delete